महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२४ एप्रिल। मुंबई । निखिल गाडे ।राज्यात खासगी वाहनांच्या नोंदणीस 1 मेपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. या आदेशानुसार, नव्याने वितरीत होणारे लर्निंग व ड्रायव्हिंग लायसन्सची प्रक्रियाही 30 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पुढील आदेश येईपर्यंत आरटीओंमध्ये अभ्यागतांना प्रवेश मिळणार नसल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवेतील वाहनांच्या नोंदणीस आरटीओंना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. याउलट खासगी वाहनांच्या नोंदणीस 1 मेपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. केंद्र शासनाने ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत 30 जूनपर्यंत वाढवलेली आहे.त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण व नक्कल प्रत मिळवण्यासाठी अर्ज केलेल्या चालकांना कोणतीही अडचण येणार नाही. याउलट याआधीच वाहन नोंदणीसाठी अर्ज केलेल्या वाहनांची नोंदणी पूर्ण होणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. पुढील 8 दिवस राज्यातील आरटीओंमध्ये प्रलंबित कामे मार्गी लावण्यात येणार आहेत.
या निर्णयाचा मोठा फटका खासगी वाहन विक्रीला बसणार आहे. या निर्णयामुळे मुंबईतील सुमारे 4 हजार दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी रखडली आहे. वाहन खरेदी मालकांनी घाबरण्याचे कारण नसून शासनाने लादलेले निर्बंध उठताच संबंधित वाहनांची नोंदणी केली जाईल, अशी माहिती परिवहन विभागाने दिली आहे.