महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२४ एप्रिल। मुंबई । लक्ष्मण रोकडे । विशाखापट्टणम येथून ऑक्सिजनचे सात टँकर भरून निघालेली रेल्वेची पहिली ऑक्सिजन एक्प्रेस अखेर शुक्रवारी रात्री आठ वाजता महाराष्ट्रातील नागपूर स्थानकात दाखल झाली आहे. सोमवारी 19 एप्रिल रोजी कळंबोली येथून ही ऑक्सिजन एक्प्रेस विशाखापट्टणम येथे रवाना झाली होती.
महाराष्ट्रात कोविड संकटामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर रेल्वेने रो रो सेवेद्वारे ऑक्सिजन पुरविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ऑक्सिजनच्या टँकरची वाहतूक करताना काळजी घ्यावी लागत असल्याने मध्य रेल्वेने घाट मार्ग न निवडता व्हाया वसई रोड, जळगाव, नागपूर, रायपूर जंक्शन ते विशाखापट्टणम असा लांबचा मार्ग निवडला. विशाखापट्टणम स्टील प्लांट सायडींगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकरमध्ये भरून ही ट्रेन महाराष्ट्रात आली आहे. आज सायं. 8वा. ही ट्रेन नागपूर स्थानकात पोहचली.
नागपूर स्थानकात सात टँकरपैकी 3 टँकर उतरविण्यात येणार असून उर्वरित टँकर महाराष्ट्रातील नाशिक रोड स्थानकात उतरविण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस उद्या सकाळी नाशिकरोड स्थानकात पोहोचणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.