महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२४ एप्रिल। मुंबई । लक्ष्मण रोकडे । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नववी ते बारावीच्या पेपर पॅटर्नमध्ये बदल केला आहे. प्रश्नपत्रिकेतील लघु आणि दिर्घोत्तरी प्रश्नांचे प्रमाण कमी केले असून त्याऐवजी विद्यार्थ्यांच्या वैचारिक क्षमतेवर भर देणारे आणि बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश प्रश्नपत्रिकेत करण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच वर्ष 2021-22 पासून हा बदल अमलात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या वैचारिक क्षमतेचा विकास व्हावा यासाठी सीबीएसईने पेपर पॅटर्न बदलला आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हे वास्तविक जीवनाशी आधारित असणार आहेत. तसेच दहावी, बारावी परीक्षेतील लघु आणि दीर्घोत्तरी प्रश्नही 10 टक्क्यांनी कमी केले आहेत. राज्यातील विविध शिक्षक संघटना आणि शिक्षणतज्ज्ञांनीही राज्य शिक्षण मंडळाला हा पेपर पॅटर्न स्वीकारण्याची मागणी केली आहे.
नववी, दहावीला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतेवर आधारित प्रश्नांचे प्रमाण 30 टक्के असेल. यात बहुपर्यायी प्रश्न, केस स्टडी, इंटीग्रेटेड आदी प्रश्न विचारण्यात येतील.याशिवाय 20 टक्के ऑब्जेटीव्ह प्रश्न असतील. लघु आणि दिर्घोत्तरी प्रश्नांचे प्रमाण 60 वरून 50 टक्के करण्यात आले आहे.