महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२७ एप्रिल। कोल्हापूर । सोलापूर शहर व परिसर आणि कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने सोमवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावली असून, रस्त्याकडेची झाडे पडली, तर अनेक घरांचे नुकसान झाले आहे. जीवितहानी मात्र झाली नाही. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी सुरूच होत्या. कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटही झाली आहे.
मध्य महाराष्ट्रात चक्रीय वाऱयाची स्थिती निर्माण झाल्याने पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी मुंबई, कोल्हापूर व अन्य ठिकाणी पाऊस झाला. आज सांगली, कोल्हापूर, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि मराठवाडय़ात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मंगळवारी नगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सोलापूर, मराठवाडा येथे, तर बुधवारी नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, मराठवाडय़ात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सोमवारी दिवसभर उकाडा होता. सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले आणि वादळी वाऱयासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सोलापुरातील नीलमनगर येथील काहींच्या घरांवरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. शास्त्र्ााrनगर, कुमठा नाका परिसरात घरांच्या पडझडीबरोबरच रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतूक काही काळ बंद झाली होती, तर विजेच्या ताराही अनेक ठिकाणी तुटून पडल्या होत्या. त्याचबरोबर एमआयडीसी परिसरातील महादेव चौक येथे एका मंदिरासमोरील पत्रे उडाले असून, अक्कलकोट रोड, देसाईनगर व कामगार वस्त्यांत अधिक नुकसान झाल्याचे वृत्त आहे. शहरातही प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले होते. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी सुरूच होत्या.
कोल्हापूर जिल्ह्यात आज दुसऱया दिवशीही ढगांच्या गडगडाटात वळवाच्या पावसाने हजेरी लावली. जोतिबा डोंगरावरही काही काळ गारांचा पाऊस पडला. गेल्या काही दिवसांपासून उकाडय़ाने जिल्हावासीय हैराण आहेत. काल सायंकाळी विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात अचानक पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे काही काळ सुखद गारवा निर्माण झाला होता. आज सायंकाळीही पुन्हा वळवाच्या पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. काही ठिकाणी गाराही कोसळल्या.
आगामी चार दिवसांत राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱयांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तसेच शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचेसुद्धा हवामान खात्याने सांगितले आहे.