महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२७ एप्रिल। नवीदिल्ली । काेराेनाच्या महामारीचा धाेका वेगाने देशभरात पसरत आहे. मृत्यूच्या वाढत्या संख्येने सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशाच परिस्थितीमध्ये सध्या देशात सुरू असलेल्या आयपीएलवरही भीतीचे सावट निर्माण झाले. यातूनच आयपीएलच्या खेळाडूंच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. मात्र, याच कठीण काळामध्ये आपल्या लाखाे चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्याची शक्ती आयपीएलमध्ये आहे. त्यामुळे सुरक्षितपणे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंनी आपल्या चाहत्यांना या काळात आनंदाचा ठेवा द्यावा, अशा शब्दांत दिल्ली कॅपिटल्सचा काेच रिकी पाँटिंगने युवा खेळाडूंना माैलिक सल्ला दिला. सध्या भीतीच्या वातावरणामुळेच स्पर्धेतून आता भारताचा गाेलंदाज आर. अश्विनसह काही विदेशी खेळाडूंनी माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. विदेशी खेळाडूंमध्ये खास करून आॅस्ट्रेलियाच्या अँड्रयू टायसह झंपा, रिचर्ड््सनचा समावेश आहे. दुसरीकडे अशा प्रकारच्या परिस्थितीही आम्ही कडक सुरक्षा व्यवस्था करून आयपीएल निश्चित वेळापत्रकानुसारच सुरू ठेवणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही, अशा शब्दांत बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली.
काेराेनाच्या संकटाने सर्वच ठिकाणी थैमान घातले आहे. त्यामुळे कुटुंबीयांच्या मनात भीतीनेही थैमान घातले. यातून कुटुंबीयांतील प्रत्येक जण प्रचंड दबावात आहे. या सर्वांच्या काळजीपोटी मी यंदाच्या आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, सध्याची निर्माण झालेली गंभीर परिस्थिती पूर्णपणे निवळल्यानंतर पुन्हा आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यास आपण उत्सुक आहे, अशा शब्दांत आर. अश्विनने प्रतिक्रिया दिली. ताे यंदाच्या आयपीएलमध्ये ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स संघाकडूून खेळत हाेता. बीसीसीआयने या परिस्थितीतही प्रत्येकासाठी चांगल्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे.