महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । लक्ष्मण रोकडे । दि.२८ एप्रिल। मुंबई । दोनच दिवसांपूर्वी राज्यात सगळ्यांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून झाल्याचे सूतोवाच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिले होते. पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर आज स्पष्टीकरण दिले आहे. हा विषय आज कॅबिनेटमध्ये चर्चेला येणार आहे. त्यावर बैठकीत चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री याबाबत अंतिम निर्णय घेतील. संपूर्ण देशाला लसीची कमतरता जाणवते आहे. लस उत्पादनावर, ऑक्सिजन प्लांटवर, रेमडेसिविर इंजेक्शन कंपन्यांवर केंद्र सरकारचे नियंत्रण आले आहे. देशातील सर्व जनतेचे लसीकरण करून देण्याचे काम केंद्र सरकारने करायला हवे. पण भारत सरकारची ४५ पासून पुढे सगळ्यांचे मोफत लसीकरण करण्याची भूमिका आहे. पण ४४ वयोगटापर्यंतच्या लोकांचे काय? असे देखील आम्ही विचार करत आहोत. जर तशीच वेळ उद्या पडली, तर राज्य सरकार कुठेही मागे पडणार नसल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.
केंद्र सरकारने येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार सर्व राज्यांमध्ये लसीकरणाची तयारी सुरू झाली आहे. लसीचा पुरेसा साठा आणि लसीची किंमत या दोन मुद्द्यांवर महाराष्ट्रात चर्चा सुरू असून एवढ्या मोठ्या प्रमाणात लसींचा साठा कसा उपलब्ध होणार? हा मोठा प्रश्न आहे. त्यासोबतच, लसींची किंमत देखील सीरम आणि भारत बायोटेकने वाढवल्यामुळे राज्यात मोफत लसीकरण करता येईल का? यावर चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भात अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.