महाराष्ट्र २४ : कोल्हापूर – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात गवारीस दहा किलोस २५० ते ४५० रुपये दर मिळाला. गवारीची दररोज पन्नास ते साठ पोती आवक झाली. टोमॅटोची गेल्या महिन्यापासूनची वाढलेली आवक या सप्ताहातही कायम राहिली. टोमॅटोस दहा किलोस २० ते ६० रुपये दर होता. वांग्याची तीनशे ते चारशे करंड्या आवक झाली. वांग्यास दहा किलोस ५० ते २५० रुपये दर मिळाला.
ओली मिरचीची दररोज नऊशे ते एक हजार पोत्यांची आवक होती. ओल्या मिरचीस दहा किलोस १०० ते ३०० रुपये दर होता. या सप्ताहाच्या तुलनेत या सप्ताहात थंडी, धुके याचे प्रमाण कमी जास्त राहिले. याचा परिणाम भाजीपाल्याच्या व्यवस्थापनावर होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सातत्याने हवामान बदलत असल्यामुळे भाजीपाल्याच्या काढणीवरही परिणाम होत आहे. विशेष करून वांग्यासह अन्य फळभाज्यांच्या व्यवस्थापनाकडे जादा लक्ष द्यावे लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बाजार समितीत ओला वाटाण्याची तीनशे ते चारशे पोती आवक होती. ओल्या वाटाण्यास दहा किलोस २०० ते ४०० रुपये दर होता. कारल्याची पन्नास ते शंभर पाट्या आवक झाली. कारल्यास दहा किलोस १०० ते २०० रुपये दर होता. दोडक्याची शंभर ते दीडशे करंड्या आवक झाली. दोडक्यास दहा किलोस ५० ते २५० रुपये दरमिळाला. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीस २२ ते २५ हजार पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा २०० ते ६०० रुपये दर होता. मेथीची १५ ते १६ हजार पेंढ्यांची आवक होती. मेथीस शेकडा ३०० ते ६०० रुपये दर मिळाला. पालक, पोकळा, शेपूस शेकडा ३०० ते ४०० रुपये दर होता. फळांमध्ये डाळिंबास किलोस १० ते २० रुपये, बोरास किलोस १० ते १५ रुपये दर मिळाला. सांगली जिल्ह्यातून द्राक्षाच्या आवकेस सुरुवात झाली आहे. द्राक्षास किलोस १५ ते ३० रुपये दर होता.