महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।अहमदाबाद । दि.१ मे । हरप्रीत ब्रार ( Harpreet BRAR) हे नाव शुक्रवारपर्यंत फारसं कुणाच्या ओळखीचंही नव्हतं. पण, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( RCB) विरुद्धच्या सामन्यानंतर ते प्रत्येकाच्या ओठावर आहे. चंढीगडच्या झिराकपूर येथील हरप्रीतला पंजाब किंग्सनं ( Punjab Kings) मैदानावर उतरवले अन् त्यानं संधीचं सोनं केलं.
हरप्रीतनं पहिल्या दोन षटकांत १७ धावा दिल्या होत्या. ११व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर RCBचा कर्णधार विराट कोहली फटका मारण्यासाठी पुढे आला अन् चेंडू खाली राहिल्यानं तो थेट यष्टींवर आदळला. दुसऱ्या चेंडूत ग्लेन मॅक्सवेलचा उजवा त्रिफळा उडवून त्यानं मोठा धमाका केला. हे षटक निर्धाव गेलं अन् पुढच्याच षटकात हरप्रीतनं डिव्हिलियर्स ला एक्स्ट्रा कव्हरवर उभ्या असलेल्या लोकेश राहुलकरवी झेलबाद करून माघारी पाठवले.
आयपीएल २०२१चा पहिलाच सामना खेळणाऱ्या कोणत्याही गोलंदाजाला जगातील तीन दिग्गज फलंदाजांना बाद करण्यात यश मिळाले, याहून अधिक आनंद काहीच होऊ शकत नाही. हरप्रीतनं गोलंदाजीत कमाल दाखवण्यापूर्वी फलंदाजीत २५ धावांचं योगदान देताना लोकेश राहुलसह सहाव्या विकेटसाठी ३२ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी केली.