महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ८ मे । राज्यात १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू आहे. मात्र, लसींचा तुटवडा, केंद्रांवर होणारा गोंधळ लक्षात घेता आता १८ ते ४४ या वयोगटासाठीच्या वर्गीकरण (स्लाॅट) करून लसीकरणाचा मानस आहे. हे वर्गीकरण वयोगट किंवा सहव्याधीनुसार असेल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली. टोपे म्हणाले, तुटवड्यामुळे १८ ते ४४ वयोगटासाठी मोजक्या केंद्रांवरच लसीकरण सुरू असल्याने नागरिकांची गर्दी वाढली आहे. शहरांतील लाेक ग्रामीण भागात लस घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात अस्वस्थता आहे.
जोवर लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही तोवर आपल्याला वर्गीकरण करावे लागेल. वयोगट वा सहव्याधीप्रमाणे विभागणी करता येईल. म्हणून ३५ ते ४४ या वयोगटातल्या लोकांना प्राधान्य देता येईल का? त्यातही सहव्याधी असलेल्यांना अधिक प्राधान्य देता येऊ शकेल. रशियाची स्पुटनिक व्ही लस महाराष्ट्रात मागवण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यांच्याशी लसीच्या दरांबाबत बोलणी सुरू आहेत”, असेही टोपे म्हणाले.