महाराष्ट्र राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करण्याचा विचार, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – मुंबई : राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करणे यासह राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. यावेळी महिला अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या.

यावेळी महासंघाचे संस्थापक ग. दि. कुलथे यांनी महासंघाच्या विविध मागण्या मांडल्या. केंद्राप्रमाणे राज्यात पाच दिवसांचा आठवडा करावा या मागणीवर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी शासन विचाराधीन आहे. ४५ मिनिटे वाढवून, अत्यावश्यक सेवा वगळून तसेच कामकाजाच्या दृष्टीने कुठलाही परिणाम होणार नाही, अशा प्रकारचा प्रस्ताव सादर करावा. त्यावर निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.मंत्रालयात महिलांसाठी विश्रामकक्ष, महिला अधिकाऱ्यांसाठी चक्राकार पद्धतीने होणाऱ्या बदल्यांबाबत धोरण ठरविणे, विश्रामगृहांमध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी आरक्षण ठेवणे या मागण्या यावेळी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. ज्या मागण्यांवर तातडीने निर्णय होणे शक्य आहे त्या प्रलंबित ठेवू नका अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वेतन त्रुटीबाबत खंड – २ अहवाल तातडीने सादर करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. त्यावर हा अहवाल महिन्या दीड महिन्यात सादर केला जाईल, असे कुंटे यांनी यावेळी सांगितले. महागाई भत्त्याची थकबाकी देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *