भारताचे इंग्लंड, ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सामने निश्चित ? – आयसीसीने फेटाळला दावा

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १८ मे । भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड (२०१६) आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (२०१७) झालेले सामने निश्चित होते, हा ‘अल जझीरा’ या वृत्तवाहिनीने केलेला दावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) फेटाळून लावला आहे. यापैकी कोणतेही सामने निश्चित केलेले नव्हते. ‘अल जझीरा’ने केलेला दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असे ‘आयसीसी’ने स्पष्ट केले.

‘अल जझीरा’ने एका लघुपटात भारत आणि इंग्लंड यांच्यात २०१६ साली चेन्नई येथे खेळवला गेलेला तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१७ साली रांची येथे खेळवला गेलेला सामना निश्चित करण्यात आला होता, असे म्हटले आहे. या लघुपटात आरोप केलेल्या पाच व्यक्तींनी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही. या वाहिनीला कोणतेही सबळ पुरावे देता आले नाहीत, असेही ‘आयसीसी’ने म्हटले आहे.

आयसीसीने याप्रकरणी चौकशी समिती नेमली होती. ‘‘दोन सामन्यांमध्ये सामनानिश्चिती झाल्याचे आरोप लावण्यात आले होते. पण कोणत्याही प्रकारे सामना निश्चिती करण्यात आला, याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. आम्ही या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी सट्टेबाजी आणि क्रिकेटमधील तज्ज्ञमंडळींची वैयक्तिक चौकशी समिती नेमली होती. या चारही जणांनी सामन्याचा कोणताही भाग निश्चित करण्यात आलेला नाही, असे मत मांडले आहे,’’ असे ‘आयसीसी’च्या पत्रकात म्हटले आहे.

‘आयसीसी’ कोणत्याही नावाचा उल्लेख केला नसला तरी पाकिस्तानचा क्रिकेटपटू हसन रझा, श्रीलंकेचा थरंगा इंडिका आणि थारिंडू मेंडिस तसेच मुंबईचा प्रथम श्रेणी क्रिकेटपटू रॉबिन मॉरिस यांची चौकशी करण्यात आल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *