महाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार ?; आदित्य ठाकरेंनी दिले उत्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. १९ मे ।१ जूनपर्यंत राज्यात कठोर निर्बंध ठाकरे सरकारने लावले आहेत. एकीकडे कोरोनाविरोधातील लढाई राज्य लढत असताना दुसरीकडे तोक्ते चक्रीवादळाच्या निमित्ताने अजून एका संकटाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपलेला असतानाच सरकारसमोरील आव्हाने वाढण्याची शक्यता असून लॉकडाऊन वाढणार की उठवणार हे आगामी काळातच स्पष्ट होईल. दरम्यान राज्यातील वाढीव लॉकडाऊनबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येवर हे सर्व अवलंबून असेल. राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करत असून प्रत्येकाने चाचणी करावी यासाठीही पुढाकार घेत आहोत. कोरोनाबाधितांची संख्या किती आहे, यावरच लॉकडाऊन उठवला जावा की वाढवला जावा, हे अवलंबून असेल. आमची प्राथमिकता आरोग्य आणि सुरक्षा असणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.ते पुढे म्हणाले की, लॉकडाऊन असला तरी राज्यात महत्वाची कार्यालये, निर्मिती उद्योग, आयात आणि निर्यात सुरु आहे. पण तुम्ही अनावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर कधी पडायला मिळेल, असे विचारत असाल तर ते पूर्णपणे रुग्णसंख्येवर अवलंबून आहे. या मुलाखती दरम्यान आदित्य ठाकरे यांनी लसीकरण मोहिमेवरही भाष्य केले.

राज्याला जास्तीत जास्त कोरोना प्रतिबंधक लस मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. जागतिक स्तरावरही प्रयत्न सुरु आहेत. जर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येऊ शकणाऱ्या तिसऱ्या लाटेला रोखायचे असेल, तर जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करुन त्यांना सुरक्षित करावे लागेल, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.सर्वात जलद गतीने लसीकरण महाराष्ट्रात होत आहे. आम्ही आतापर्यंत दोन कोटी लोकांचे लसीकरण केले आहे. लसीकरणासाठी सर्व गोष्टी व्यवस्थित जागेवर असून जास्तीत जास्त पुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न आहेत. सध्या आमच्यासमोर ग्रामीण भागात जास्त लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी लसीकरण करण्याचे आव्हान असल्याचे आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *