महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. १९ मे ।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांत कार्यरत जिल्हाधिकाऱ्यांशी व्हीसीद्वारे चर्चा केली. आता जिल्ह्यांनी लसीकरणाचे १५ दिवसांचे नियोजन करावे, असे मोदी म्हणाले. लसीचा पुरवठा वाढवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, अनेक राज्यांतील स्थिती अजूनही बिकट आहे. छत्तीसगड असो अथवा पंजाब. सर्वच राज्यांतील स्थिती आता बदलेल. कारण, आता राज्यांना लसीचा जो साठा उपलब्ध करून दिला जाईल त्यातून किमान १५ दिवसांचे नियोजन होऊ शकेल, असे मोदी यांनी नमूद केले. मंगळवारी मोदींनी ९ राज्यांतील ४६ जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. गुरुवारी ते १० राज्यांतील ५४ जिल्हाधिकाऱ्यांशी याच विषयावर चर्चा करतील.
सध्या कोविशील्ड व कोव्हॅक्सिनची लस उत्पादन क्षमता मासिक सुमारे ६ कोटी अाहे. यातील सर्व लस राज्यांना दिली जात नाही. आरोग्य मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्यानुसार, केंद्राला येत्या अडीच महिन्यांत १६ कोटींहून अधिक डोस मिळतील. ते राज्यांना पाठवले जातील. हे सर्व डोस ४५ वर्षांवरील लोकांसाठी असतील. येत्या १५ दिवसांत पुरेशी लस सर्वच राज्यांत उपलब्ध होईल. राज्यांना लसीकरणाचे किमान दोन आठवड्यांचे नियोजन करता यावे, एवढा लसीचा साठा असावा, अशी केंद्राची तयारी आहे. त्यानुसार संबंधितांना केंद्र, नोंदणी करून आणि ठरल्या वेळी लस दिली जाऊ शकेल.