महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २० मे ।कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन लशींची उपलब्धता खासगी रुग्णालयांनी स्वतःहून करून घ्यायची आहे, असे निर्देश केंद्र सरकारने दिले असतानाच उत्पादक कंपन्यांनी मात्र २१ मेपर्यंत ही उपलब्धता होऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे आता खासगी छोटी रुग्णालये तसेच नर्सिंग होम्सनी स्पुटनिक लसीच्या उपलब्धतेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भारतातील या लसीच्या उत्पादक कंपन्यांशी रुग्णालयांच्या एकत्रित फोरमद्वारे चर्चा सुरू झाली असून मुंबईतील खासगी रुग्णालयांना १५ जूनपर्यंत दीड लाख लसींची उपलब्धता होण्याची शक्यता असल्याची खात्रीदायक माहिती हाती आली आहे.
यासंदर्भात खासगी रुग्णालये तसेच नर्सिंग होम्सनी केलेल्या स्वतंत्र नेटवर्कच्या वैद्यकीय सदस्यांनी सांगितले की, कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन २१ मेपर्यंत उपलब्ध होणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरीही मुंबईतील काही मोठ्या रुग्णालयांमध्ये या लशी उपलब्ध झाल्या आहेत. त्याचप्रमाणे स्पुटनिकही उपलब्ध व्हावी, यासाठी एकत्रित मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या लसीची किंमत ९९५ रुपये निर्धारित करण्यात आली आहे, त्यावर हे दर जाऊ नयेत यासाठी संबधित उत्पादक कंपनीशी चर्चा करणारे वैद्यकीय समिती सातत्याने प्रय़त्नशील आहे.