महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २२ मे । राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) तोटा कमी करण्यासाठी ५०० खासगी साध्या गाड्या भाड्याने घेण्याचा घाट घातला असून आगारांकडून त्यासंदर्भातली माहिती मागवण्यात येत असल्याचा आरोप एसटी कामगार संघटनांनी केला आहे. तसेच या साध्या खासगी गाड्या एकाही फलाटाला लागू देणार नाही, असा पवित्रा संघटनांनी घेतला आहे.
राज्यातील विविध आगारांना एसटी महामंडळाच्या मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाने पत्रे पाठवली असून २५० ते ३०० किमी अंतराचे मार्ग, इतर गाड्यांना थांबवण्यासाठी डेपोत असलेली जागेची उपलब्धता याची माहिती मागवली आहे. महामंडळाने शिवशाहीप्रमाणेच या खासगी गाड्या भाड्याने घेण्याचा प्रयत्न चालवला असून यास आमचा विरोध असल्याचे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी सांगितले.
शिवशाही गाड्या महामंडळाने खासगी तत्त्वावर भाड्याने घेतल्या होत्या. त्याचे अपघात इतके झाले की त्याने महामंडळाची बदनामी झाली. तोच प्रकार पुन्हा महामंडळ करत आहे, असा आरोप कामगार संघटनांचा आहे. गेली ५० वर्षे महामंडळाची लाल गाडी विविध मार्गांवर धावत आहे, त्या जागी आम्ही खासगी गाडी येऊ देणार नाही. या निर्णयाविरोधात आम्ही महामंडळास पत्र पाठवले आहे, असे कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले. दीर्घ पल्ल्याच्या मार्गावर या गाड्या चालवण्याचे प्रयत्न सुरू असून याचे उत्पन्न खासगी गाड्यांना मिळेल. मग महामंडळाचा तोटा कमी कसा होणार, असा प्रश्न कामगार उपस्थित करत आहेत.
फडणवीस सरकारच्या काळात परिवहन विभाग शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांच्याकडे होता. त्यांच्या काळात शिवशाही या खासगी गाड्यांचा महामंडळात शिरकाव झाला. आता परिवहन विभाग शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांच्याकडे आहे. त्यांनी चक्क लाल गाड्या खासगी घेण्याचा घाट घातला आहे.
एसटी महामंडळाकडे १७ हजार ५०० गाड्या असून १ लाख ५ हजार कर्मचारी आहेत. महामंडळाचा तोटा ७ हजार काेटींवर गेला आहे.टाळेबंदीच्या काळात दैनंदिन तोटा २० हजार कोटींच्या वर गेला असून महामंडळ सध्या कर्मचाऱ्यांचे वेतनसुद्धा देऊ शकत नाही. परिणामी, उत्पन्नाचे नवे मार्ग महामंडळ शोधत आहे. त्यातून या निर्णयाप्रत अाल्याचे महामंडळाचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.