इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मिळाली चांगली बातमी!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २२ मे । इंग्लंड दौर्‍यावर जाणार्‍या टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा करोनातून सावरला आहे. आता तो २३ मे रोजी बंगळूरहून मुंबईला पोहोचणार आहे. आयपीएल २०२१मध्ये करोना पॉझिव्ह आढळलेल्या कोलकाता नाइट रायडर्सच्या (केकेआर) चार खेळाडूंमध्ये कृष्णाचा समावेश होता.

केकेआरच्या वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर आणि टिम सेफर्ट यांनाही कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे आढळले. उर्वरित तीन खेळाडूदेखील करोनातून पूर्णपणे सावरले आहेत. खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर ४ मे रोजी आयपीएल पुढे ढकलण्यात आले. स्पर्धेत फक्त २९ सामने खेळवण्यात आले असून ३१ सामने बाकी आहेत.

यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कृष्णाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यात त्याने ६ विकेट्स घेतल्या. आता आगामी इंग्लंड दौर्‍यासाठी निवडलेल्या संघात स्टँडबाय म्हणून त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्याशिवाय वेगवान गोलंदाज आवेश खान, अर्जन नागवासवाला आणि फलंदाज अभिमन्यू ईश्वरन यांचादेखील समावेश आहे.

भारतीय संघ २ जून रोजी इंग्लंड दौर्‍यावर रवाना होईल. तेथे हा संघ प्रथम न्यूझीलंडविरूद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. हा सामना १८ ते २२ जून दरम्यान असेल. यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. ४ ऑगस्टपासून नॉटिंगहॅमध्ये याची सुरुवात होईल. मालिकेचा शेवटचा सामना मँचेस्टरमध्ये १० सप्टेंबर रोजी खेळला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *