मोदींचा राहुल गांधींवर पलटवार; दंडुक्याला सूर्य नमस्काराने उत्तर देईल

Spread the love

महाराष्ट्र २४ – नवी दिल्ली: सहा महिन्यात मला दंडुक्याचा मार बसेल असं काही लोक म्हणतात. त्यामुळे सहा महिन्याची सवड असल्याने मीही दंडुक्याला सूर्य नमस्काराने उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. आता सहा महिने सूर्य नमस्काराची संख्या वाढवेल. त्यामुळे माझ्या पाठिवर दंडुक्याचा काहीच परिणाम होणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांचं नाव न घेता प्रत्युत्तर दिलं.

संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. मोदींनी आपल्या खुसखुशीत भाषणातून कधी टीका करत तर कधी चिमटे काढत विरोधकांच्या प्रत्येक मुद्द्यांचा समाचार घेतला. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना एका रॅलीत राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली होती. देशातील तरुणांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. सहा महिन्यानंतर मोदींना देशातील लोकांच्या दंडुक्याचा मार खावा लागेल, असं राहुल म्हणाले होते. त्यावरून भाजपने काँग्रेसवर टीकाही केली होती. मोदींनी आज या मुद्द्याचाही समाचार घेतला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचं थेट नाव न घेता, दंडुक्याला सूर्य नमस्काराने उत्तर देईल, असं म्हटलं. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ सुरू झाला. यावेळी राहुल गांधी यांनीही काही तरी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या दिशेने इशारा करत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्नही केला.

या गोंधळावरही मोदींनी टिप्पणी केली. अध्यक्ष महोदय, गेल्या ३०-४० मिनिटांपासून मी बोलतोय. पण करंट तिथे पोहचण्यास वेळ लागला. यांचं हे असंच असतं, असा चिमटा मोदींनी काढताच सत्ताधाऱ्यांमध्ये एकच खसखस पिकली. मोदींच्या भाषणाची सुरुवातही जोरदार झाली. मोदी आपल्या भाषणात महात्मा गांधींचा उल्लेख करत होते. त्यावेळी विरोधी सदस्यांनी काही भाष्य केलं. त्यावर मोदी म्हणाले, गांधीजी तुमच्यासाठी केवळ ट्रेलर असतील, पण आमच्यासाठी गांधी म्हणजे जीवन आहे. मोदींच्या या वक्तव्यानंतर विरोधकांची बोलतीच बंद झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *