महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २४ मे । कोरोनाच्या दुसर्या लाटेवर आपण नियंत्रण मिळविले आहे. आता तिसरी लाट येऊ शकते. मात्र प्रयत्नपूर्वक ही लाट आपण थोपवू शकतो, असा आत्मविश्वास राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी रविवारी केले. मुंबईच्या बोरिवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत मास्क हा आपल्या पेहरावातला एक अविभाज्य भाग बनविणे आवश्यक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. शुक्रवारी सुरू झालेल्या फेसबुक लाईव्ह वसंत व्याख्यानमालेचे ‘कोरोनाशी लढाई आपण जिंकणारच’ या विषयावरील दुसरे पुष्प गुंफताना डॉ. लहाने यांनी गेल्या दोन वर्षांतील कोरोना विरोधातील युद्ध लढताना काय काय उपाययोजना कराव्या लागल्या याची सविस्तर माहिती दिली.
कोरोना विषाणू जसा भारतात पर्यायाने महाराष्ट्रात आला तेव्हा वैद्यकीय सुविधा फारच कमी होत्या आणि मग त्या कशा वाढत गेल्या त्याची माहिती देतानाच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा फार मोठा फायदा शासकीय यंत्रणेला झाल्याचे आवर्जून सांगितले. वैद्यकीय आणि शास्त्रीय, वैज्ञानिक या बाबींची सांगड घालून योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात आले. त्यामुळे आपण सर्व आरोग्य यंत्रणा आणि वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलिस यांच्या समन्वयाने कोरोनावर नियंत्रण आणू शकलो, असे ते म्हणाले.
मास्क, सॅनिटायझर आणि सतत हात धुणे या गोष्टी अतिशय सोप्या शब्दांत समजावून सांगताना डॉ. लहाने यांनी आजही 50 टक्के लोक मास्क वापरत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अडथळे निर्माण होत असल्याचे ते सांगतात.