महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २४ मे । पहिल्या लाटेपेक्षा दुसऱया तिसऱया लाटेमध्ये लहान मुलांवर परिणाम होत आहे. आमची बाजू न्यायालयासमोर मांडणार आहोत. सध्याची कोरोना संसर्गाची परिस्थिती असाधारण परिस्थिती आहे. इंटरनेट आणि इतर समस्यांमुळे ऑनलाईन परीक्षेचा विचार करता येत नाही. यामुळे दहावीच्या परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम आहे. मुंबई हायकोर्ट सहानुभूतीनं निर्णय घेईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली.
उच्च न्यायालयाने दहावीच्या परीक्षांबाबत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात न्यायालयात सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर करून भूमिका मांडणार आहे. यावर गुरुवारी न्यायालयाचा निर्णय येणं अपेक्षित आहे. याबाबत बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी दोन दिवसांत बैठक घेणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय न्यायालयाने कायम केल्यास अंतर्गत मूल्यमापन तसेच अन्य पद्धतीने निकाल देण्याबाबत विचार करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अकरावी प्रवेशासाठी सीईटी घ्यावी का, याबाबतही सरकार प्रयत्नशील आहे. लेखी परीक्षेसाठी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका तयार आहेत. परीक्षा घेण्याबाबत शाळांना तयारी करावी लागणार आहे.