महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २४ मे । गेल्या दीड-दोन महिन्यांपासून कोरोना संकटाशी दोन हात करणाऱ्या राज्यातील नागरिकांसाठी जून महिना आनंदाची झुळूक घेऊन येणारा ठरणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये आता कोरोनाचा प्रादुर्भाव घटताना िदसतो अाहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी आणि मृतांचा अाकडाही कमी असेल त्या जिल्ह्यांमध्ये १ जूननंतर लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. जून महिन्यात लसींचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर राज्यभरात २४ तास लसीकरण मोहीम राबवण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी बालरोगतज्ज्ञांच्या बैठकीत बोलताना दिली. तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजे येत्या १० जून रोजी मान्सून तळकोकणात दाखल होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.
सरलेल्या आठवड्यात १७ ते २२ मे या कालावधीत रुग्णसंख्या कमी होताना दिसत असून ती ३० हजारांच्या आत आली आहे. केवळ बुधवार, १९ मे रोजी संख्या ३० हजारांपेक्षा अधिक होती. नाशिक, कोल्हापूर व अहमदनगर जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या घटली असल्यानेच कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले होते.
लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी १२ कोटी लसी एकरकमी घेण्याची राज्याची तयारी आहे, पण लसी उपलब्ध नाहीत हीच अडचण आहे. जूननंतर लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असून तेव्हा २४ तास लसीकरण राबवले जाईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेला दिली.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात राज्य सरकार सध्या तयारी करत आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील ६ हजार ३०० बालरोगतज्ज्ञांशी संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, लहान मुलांच्या बाबतीत आपला डॉक्टर्सवर अंधविश्वास असतो. डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण लहान मुलांच्या बाबतीत आपण करतो. रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये याची मात्र काळजी घ्या, अशी सूचना केली. काय करावे आणि काय करू नये ते नेमके आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या. डॉक्टर्सनीदेखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे, असे त्यांनी बजावले. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा व इतर काही बाबींचा तुटवडा जाणवला. आता ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी ठोस पावले टाकली आहेत. जूननंतर लसपुरवठा सुरळीत सुरू होईल त्यानंतर सर्व नागरिकांचे लसीकरण वेगाने सुरू करू शकू, असे मुख्यमंत्री म्हणाले.