महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २४ मे । भारतीय कंपनी पॅनासिया बायोटेकनं रशियन लस असलेल्या ‘स्पुटनिक व्ही’चं उत्पादन सुरु केलं आहे. रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडच्या मदतीने हे उत्पादन सुरु करण्यात आलं आहे. पॅनासिया कंपनी स्पुटनिव्ह व्ही लसीचे वर्षाला १० कोटी डोस तयार करणार आहे. आरडीआयएफ आणि पॅनासिया बायोटेकनं लस निर्मितीसाठी करार केला होता. त्या करारानुसार लस निर्मिती सुरु झाली आहे. त्यामुळे भारतातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे.पॅनासिया बायोटेक कंपनीनं हिमाचल प्रदेशातील बद्दी कारखान्यात स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती सुरु केली आहे. या कारखान्यात तयार करण्यात आलेल्या लशींची पहिली खेप रशियाच्या गामालेया केंद्रात पाठवली जाणार आहे. तिथे या लसीची गुणवत्ता पारखली जाणार आहे.
“पॅनासिया बायोटेकसोबत आम्ही भारतात उत्पादन सुरु केलं आहे. यामुळे देशातील करोना स्थितीशी लढण्यात मदत होणार आहे. भारतात लसींची पूर्तता झाल्यानंतर इतर देशांमध्ये त्याची निर्यात केली जाणार आहे.”, असं आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल्ल डमित्रिव यांनी सांगितलं आहे. “स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती भारतात सुरु झाल्याने त्याचा भारताला फायदा होणार आहे. लसीकरण मोहीम वेगाने झाल्यास पुन्हा सामान्य जीवन जगता येईल”, असं पॅनासिया बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जैन यांनी सांगितलं आहे.
कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिननंतर भारतात स्पुटनिक व्ही लसीला मान्यता देण्यात आली आहे. करोना लसींचा तुटवडा पाहता स्पुटनिक व्ही लशीला परवानगी देण्यात आली होती. भारत सरकारने १२ एप्रिल २०२१ रोजी या लसीला मंजुरी दिली होती. त्यानंतर १४ मे पासून या लसीचा डोस दिला जात आहे.