महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २५ मे । ‘यास’ चक्रीवादळ हे तौक्ते चक्रीवादळापेक्षाही तुफानी असणार आसल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. पश्चिम बंगाल, ओदिशा, बिहार, छत्तीसगड, झारखंड या राज्यांना यास चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्राला याचा धोका नाही (Cyclone Yaas Is Worse Than The Cyclone Tauktae ).
फक्त कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यास चक्रीवादळ पश्चिम बंगालमधून ओदिशाच्या किनारपट्टीकडे सरकतंय, या वादळाचं लॅण्डफॉल हे भुवनेश्वर इथं होणार आहे. यास चक्रीवादळाचा वेग हा ताशी 185 की.मी पर्यंत जाण्याची शक्यता आहे, असा अंदाज पुणे हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
प्रत्येक चक्रीवादळाला कुठले ना कुठले नाव दिलेले असते. हे नाव वेगवेगळे देश देत असतात. नुकतेच धडकून गेलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवाळाला म्यानमारने नाव दिले होते. अगदी तशाचप्रकारे ‘यास’ वादळाला ओमानच्या नावावरून नाव पडले आहे. वादळांना नाव देण्याची एक निर्धारीत प्रक्रिया आहे. त्याच प्रक्रियेला अनुसरून ‘यास’ वादळाचे नावही निर्धारीत प्रक्रियेनंतर ठेवले गेले आहे. ‘यास’ हा पर्शियन भाषेतील शब्द आहे, ज्याचा इंग्रजीमध्ये अर्थ ‘जॅस्मिन’ असा आहे. चक्रीवादळ ‘यास’ची परिणामकारकता लक्षात घेऊन ओडिसा, पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्सची ((NDRF) पथके जागोजागी तैनात करण्यात आली आहेत. किनारपट्टी भागात लोकांना वादळाच्या धोक्याविषयी वारंवार सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. बंगालच्या प्रशासनाकडून स्थानिक नागरिकांशी विशेषत: मेदनापूर, सुंदरवन आणि आसपासच्या भागातील रहिवाशांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे.
‘यास’ चक्रीवादळ हे ओमानमधून आले आहे. या वादळाच्या वाऱ्यांचा वेग ताशी 50 किलोमीटर इतका आहे. या वादळाचे केंद्र पश्चिम बंगालची राजधानी कोलकातापासून सुमारे 750 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगितले जात आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव 48 तास राहील. वादळ भीषण रूप धारण करून हाहाकार उडवून देणार आहे. याचा प्रभाव विशेषत: उत्तर-पश्चिम दिशेने ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये दिसून येईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 25 मे रोजी उशिरा रात्री किंवा 26 मे रोजी सकाळी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन्ही राज्यांनी वादळाच्या भीषण परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी तयारी केली आहे.