महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ मे । सोन्याच्या किंमतीत (Gold Prices) मंगळवारी काहीसा दिलासा पाहायला मिळतो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today) घसरल्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या दरावर देखील झाला आहे. एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange MCX) मंगळवारी सोन्याच्या दरात 0.20 टक्क्यांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर दर 48,455 रुपये प्रति तोळा झाले आहेत. एचडीएफसी सिक्योरिटीच्या मते कमजोर मागणीमुळे सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. सोन्याबरोबर आज चांदीही (Silver Price) घसरली आहे. 0.45 टक्क्यांच्या घसरणीनंतर चांदीचे दर 71,487 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डची किंमत 0.3 टक्क्यांच्या घसरणीनंतर 1,876.24 डॉलर प्रति औंस झाली आहे. तर चांदीचे दर (Silver Price Today) 0.7 टक्क्यांनी घसरून 27.60 डॉलर प्रति औंस झाले आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात प्लॅटिनमच्या किंमती 1,174 डॉलरवर स्थिर आहेत.
मंगळवारी सोन्याची किंमत 48,455 रुपये प्रति तोळा आहे. तर चांदीचे दर देखील 71,487 रुपये प्रति किलो आहेत. याधीच्या सत्रात सोन्याचे दर 0.26 टक्क्यांनी वाढून चार महिन्यातील सर्वोच्च पातळीवर बंद झाले होते. तर चांदीमध्ये एका टक्क्याने उसळी पाहायला मिळाली होती.
तज्ज्ञांच्या मते सोन्याचांदीच्या किंमतीत आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरस हे देखील सोन्याचे दर वाढण्यामागील एक कारण असू शकतं. या काळात एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही सामना करावा लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सोन्याचे दर 50 हजारांपेक्षा जास्त होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्ही जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सध्याचा काळ योग्य आहे.