महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २६ मे ।दहावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे या वर्गाचे निकाल लावले जातील असे शपथपत्र शालेय शिक्षण विभाग न्यायालयात सादर करणार असून दोनच दिवसांत दहावी परीक्षेसंदर्भातील निर्णय अपेक्षित आहे. दहावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय तुम्ही रद्द करता की आम्ही रद्द करू, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने मागच्या आठवड्यात राज्य सरकारला धारेवर धरले आणि शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शपथपत्र तयार करताना सरकारने परीक्षा रद्द करण्याची भूमिका बदललेली नाही.
उलट हे शपथपत्र न्यायालयात सादर करताना त्याच आधारे दहावीच्या अंतर्गत मूल्यमापन संदर्भातील शासन निर्णय जारी केला जाणार आहे.अंतर्गत मूल्यमापन कशा पद्धतीचे असेल याची पहिली घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे करणार असल्याचे शिक्षण विभागातील उच्चस्तरीय अधिकार्यांनी सांगितले.
कोरोनाचा धोका असल्याने दहावीच्या परीक्षा आम्ही रद्द केल्या आहेत. अंतर्गत मूल्यमापन आणि मिळणारे गुण मान्य नसल्यास कोरोना आटोक्यात आल्यानंतर परीक्षा अथवा इतर पर्याय दिले जातील, असे सरकारने या शपथपत्रात नमूद केले आहे.