महाराष्ट्र २४, पुणे- अण्णा हजारे यांनी आतापर्यंत अकरा वेळा विविध मागण्यांसाठी मौन आंदोलन केले आहे. 1990 मध्ये वन विभागातील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी त्यांनी केलेले मौन 44 दिवस चालले होते. आतापर्यंत त्यांचे हे सर्वाधिक काळ चाललेले मौन मानले जात होते. सध्या सुरू असेल्या मौन आंदोलनाने हा विक्रम मोडला गेला आहे.
दिल्लीतील निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, यासह महिलांच्या सुरक्षेसंबंधीच्या अन्य प्रश्नांवर हजारे यांनी 20 डिसेंबर 2019 पासून आंदोलन सुरू केले आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. दोनदा वॉरंट निघूनही कायद्यातील तरतुदींचा आधार दोषींकडून घेतला जात असल्याने प्रकरण लांबतच आहे. प्रत्यक्ष फाशी झाल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी हजारे यांची ठाम भूमिका असल्याने त्यांचे मौनही लांबत आहे.
दिल्लीत वेगवान घडामोडी घडत असल्या, तरी फाशी लांबत आहे. मात्र, आता प्रकरण मार्गी लागले असल्याने हजारे यांनी मौन सोडावे यासाठी त्यांच्या सहकार्यांनी प्रयत्न केले. राळेगणसिद्धीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह होता. गुरुवारी काल्याच्या कीर्तनाने त्याची सांगता झाली. ग्रामस्थांसोबत हजारेही या सप्ताहात सहभागी होत असतात. या सप्ताहाच्या सांगताप्रसंगी हजारे यांनी आपल्या मौन आंदोलनाचीही सांगता करावी, अशी विनंती त्यांना करण्यात आली होती. मात्र, त्यांनी ती अमान्य केली.