महाराष्ट्र २४, पुणे ,पिंपरी-चिंचवड – अचानक हवामानात झालेल्या बदलांमुळे गुरूवारी रात्रीपासून शुक्रवारी सायंकाळ पर्यंत वातावरण थंड आहे .पूर्वेकडील बंगालच्या उपसागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडील कोरडे वारे मध्य महाराष्ट्रात एकत्र येत आहे. त्यामुळे विदर्भासह मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर शहर आणि परिसरातही अंशत: ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे किमान तापमान वाढेल, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले होते. मात्र, हवामानात झालेल्या बदलांमुळे आकाश गुरूवारी रात्रीपासून ते शुक्रवारी सकाळपर्यंत निरभ्र राहीले. त्याचा थेट परिणाम शहरातील किमान तापमानावर झाला. गुरूवारच्या तुलनेत तीन अंश सेल्सियसने तर, सरासरीपेक्षा १.३ अंश सेल्सियसने तापमान अचानक कमी झाले. त्यामुळे पुणेकरांनी शुक्रवारी सायंकाळ पर्यंत पुन्हा थंडी अनुभवली.
शहरात गेल्या चार दिवसांपासून सातत्याने वाढणारा किमान तापमानाचा पारा गुरूवारच्या तुलनेत तीन अंश सेल्सियसने कमी झाला. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १०.१ अंश सेल्सियस नोंदले गेले. अवघ्या चोवीस तासांमध्ये किमान तापमान घसल्याने पुण्यात थंडी परतली असल्याचे दिसत आहे. सकाळी ऑफिसला जाणारे कर्मचारी, सकाळच्या सत्रात शाळेत जाणारे विद्यार्थ्यांनी पुन्हा आपले स्वेटर, जर्किन घातल्याचे चित्र रस्त्यावर दिसत आहे.