पतंजली आयुर्वेदचे सहसंस्थापक रामदेव यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – आयएमए

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २७ मे । योगगुरू आणि पतंजली आयुर्वेदचे सहसंस्थापक बाबा रामदेव यांनी लसीकरणाबाबत चालवलेली ‘चुकीच्या माहितीची मोहीम’ (मिसिन्फर्मेशन कँपेन) थांबवावी, असे आवाहन करणारे पत्र इंडियन मेडिकल असोसिएशननने (आयएमए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. रामदेव यांची याबाबतची वक्तव्ये ‘सरळसरळ देशद्रोह’ असल्याचे सांगून, अशा व्यक्तींविरुद्ध देशद्रोहाच्या आरोपाखाली विनाविलंब गुन्हा दाखल करावा, असे संघटनेने म्हटले आहे.करोना लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतरही डॉक्टर मंडळी मृत्यूमुखी पडली आहेत या रामदेव यांच्या दाव्यामुळे लोकांच्या मनात संशय उत्पन्न होईल. त्यामुळे याला आळा घालण्याची गरच असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

‘मर्यादित मनुष्यबळ आणि संसाधने असतानाही आघाडीवर काम करणाऱ्या आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या सुमारे १० लाख डॉक्टर्सनी सेवा दिल्या आहेत. मात्र त्यांची थट्टा उडवण्यात येत असून त्याला मूर्खांचे शास्त्र म्हणण्यात येत आहे, हे पाहून आम्हाला वेदना होत आहेत’, असे संघटनेच्या पत्रात नमूद केले आहे.अ‍ॅलोपॅथी औषधांमुळे लोक मरत असल्याचा दावा म्हणजे करोनाविषयक उपचारांचे नियम जारी करणाऱ्या आरोग्य मंत्रालयाला आव्हान देण्याचा प्रयत्न आहे, असे संघटनेने म्हटले आहे. लशींचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभारही मानले आहेत.

दरम्यान, अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धती व अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांबाबत केलेल्या विधानांबाबत १५ दिवसात माफी मागावी अन्यथा १००० कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी बदनामीची नोटीस आयएमएच्या उत्तराखंड शाखेने बाबा रामदेव यांना पाठवली आहे. संघटनेचे सचिव अजय खन्ना यांनी त्यांचे वकील नीरज पांडे यांच्यामार्फत सहा पानांची नोटीस दिली असून रामदेव बाबा यांनी अ‍ॅलोपॅथीची प्रतिमा धोक्यात आणताना संघटनेच्या दोन हजार सदस्यांचाही अपमान केला असल्याचे म्हटले आहे. बाबा रामदेव यांनी केलेली विधाने ही भादंवि ४९९ अन्वये गुन्हेगारी कृत्य असून पंधरा दिवसात त्यांनी माफी मागावी, अन्यथा प्रत्येक सदस्यामागे पन्नास लाख रुपये याप्रमाणे १००० कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *