महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २७ मे । महागाई सर्व सामान्यांची पाठ सोडत नसून देशात कासवगतीने पेट्रोल दरवाढ सुरुचं आहे. मुंबईत पेट्रोल शंभरीपार गेले आहे. गोरेगावात पेट्रोल १००.०४ तर डिझेल ९१.१७ दराने विकल्या जात आहे. सलग होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. काही दिवसांच्या फरकाने देशात इंधनाचे दर वाढविले जात आहेत. यापुर्वी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले होते. त्यानंतर बुधवारी किंमती स्थिर होत्या. परंतु आज (गुरुवार) पुन्हा दर वाढले आहेत. आज तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २४ पैसे आणि डिझेलच्या दरात २९ पैशांची वाढ केली आहे. मंगळवारी पेट्रोल २३ आणि डिझेल २७ पैसे महाग झाले होते.
मे महिन्यात आतापर्यंत एकूण १५ दिवस इंधन दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. या महिन्याच्या वाढीनंतर पेट्रोल ३.३३ रुपयांनी महाग झाले आहे. त्याचबरोबर डिझेल प्रति लिटर ३.८५ रुपयांनी महाग झाले आहे. एप्रिलमध्ये इंधनाचे दर काही प्रमाणात कमी करण्यात आले होते. त्यानंतर दर वाढविण्यात आले. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल प्रति लिटर १०० च्या पलीकडे विकले जात आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये देखील पेट्रोल शंभरीपार गेले आहे. गोरगावात पेट्रोल १००.०४ प्रति लिटर दराने विकल्या जात आहे.
मुंबईपुर्वी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पेट्रोल शंभरीपार गेले आहे. यामध्ये अमरावती १००.४९, औरंगाबाद १००.९५, भंडारा १००.२२, बुलडाणा १००.२९, गोंदिया १००.९४, हिंगोली १००.६९, जळगाव १००.८६, जालना १००.९८, नंदूरबार १००.४५, उस्मानाबाद १००.१५, रत्नागिरी १००.५३, सातारा १००.१२, सोलापूर १००.१०, वर्धा १००, वाशिम १००.३४, या जिल्ह्यात पेट्रोल दरवाढ झाली आहे.