महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २७ मे । यास चक्रीवादळ अखेर ओडिशात बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास धडकले. या वादळाचा वेग ताशी 110 ते 120 कि.मी. इतका आहे. त्यामुळे ओडिशासह पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या राज्यांत तुफान पावसाला सुरुवात झाली आहे. या वादळाचा थेट फटका महाराष्ट्राला बसणार नसला तरी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शुक्रवार ते रविवार या कालावधीत हा पाऊस होऊ शकतो.
यास चक्रीवादळ बुधवारी सकाळीच ओडिशा राज्यातील बालासोर शहरात धडकले. सकाळी 9 ते दुपारी 12.30 पर्यंत लॅन्डफॉलची प्रक्रिया सुरू होती. या वादळाचा वेग ताशी 100 ते 120 किलोमीटर इतका आहे. वादळाचा परीघ वाढल्याने बाजूच्या चारही राज्यांवर त्याचा प्रभाव पडणार आहे. ओडिशातील सर्व जिल्ह्यांना या वादळाने कवेत घेतले आहे. तेथे प्रचंड पूर आला आहे. सर्वच भागात वस्त्यांमध्ये पाणी घुसले आहे.अजून दोन दिवस या भागात वादळाचे तांडव सुरू राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी रात्री हे वादळ बिहारमधील पाटणाच्या दिशेने जाणार आहे. तेथे जाऊन या वादळाचे शनिवारी कमी दाबाच्या पट्ट्यांत रूपांतर होईल. त्यानंतर काही तासांनी ते शांत होईल.
या वादळामुळे राज्यात 28 ते 30 मे पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांत हा पाऊस होईल.