महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २७ मे । लॉकडाऊनमुळे उत्पन्नात घट झालेली असताना आता खाद्यतेलाच्या दरवाढीचा भडका उडाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक महागाईमध्ये होरपळून निघणार आहेत. विशेषतः सूर्यफूल तेलाच्या किमतीत अव्वाच्या सव्वा वाढ झाल्याने बहुतांश ग्राहकांनी त्यांचा मोर्चा शेंगदाणा तेलाकडे वळवला आहे. खाद्यतेलाच्या जोडीला बारीक मीठ, तांदूळ आणि मसूर डाळ अशा रोजच्या वापरातील किराणा मालाच्या किमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याची माहिती आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या किंमती वाढल्या असल्या, तरी स्थानिक बाजारातील तेलाच्या किंमती वाढण्यामागे साठेबाजी एक मोठे कारण असल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे. एका बड्या घाऊक विक्रेत्याने सांगितले की, खाद्य तेलाच्या किंमती वाढणार असल्याची कुणकुण बड्या विक्रेत्यांना व पुरवठादारांना लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाची साठेबाजी केली जात आहे. यावर सरकारही नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळे ग्राहकांना उच्चांकी दराने खाद्य तेल खरेदी करावे लागत आहे.
अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 10 वर्षांत देशातील सहा खाद्य तेलांच्या किंमती उच्चांकी पातळीवर पोहचल्या आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात मोहरीच्या तेलाची किंमत प्रति किलो 118.25 रुपये इतके होती. एप्रिल महिन्यात त्यात 155.39 रुपये, तर मे महिन्यात एकूण 39 टक्क्यांनी वाढ झाल्याने दर 164.44 रुपये प्रतिकिलोवर पोहचले आहेत. राज्यातील सर्वसामान्य घरात वापरल्या जाणार्या पाम तेलाची मे महिन्यात सरासरी किंमत 131.69 रुपये प्रतिकिलो इतकी झाली आहे. गेल्या 11 वर्षातील ही उच्चांकी किंमत आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात असलेल्या किंमतीच्या तुलनेत ही किंमत 49 टक्क्यांनी वाढले आहेत. गतवर्षी मे महिन्यात पाम तेलाची किंमत 88.27 रुपये प्रतिकिलो इतकी होती. राज्यात शेंगदाणे तेल (175.55 रुपये प्रतिकिलो), वनस्पती तेल (128.70 रुपये प्रतिकिलो), सोयाबीन तेल (148.27 रुपये प्रतिकिलो), सूर्यफूल तेल (169.54 रुपये प्रतिकिलो) या खाद्य तेलाच्या किंमतीत सुमारे 19 ते 52 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.