महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २७ मे । महाराष्ट्रात म्युकरमायकोसिस तथा काळ्या बुरशीचा उपद्रव वाढत चालला असून गेल्या सहा दिवसांत 30 रुग्णांचा मृत्यू झाला तर एकूण रुग्णसंख्या 24 तासांत 2 हजारवरून थेट 4050 वर पोहोचली आहे. म्युकरमायकोसिसचा रुग्ण कोणत्याही रुग्णालयात दाखल झाला तरी त्याची माहिती सरकारला कळवणे बंधनकारक असल्याने ही संख्या वाढल्याचे दिसते.राज्यभरात आतापर्यंत 666 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 288 वर पोहोचली आहे. गेल्या सहा दिवसांतच 30 रुग्णांचे बळी म्युकरमायकोसिसने नोंदवले. सध्या 3096 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक 284 रुग्ण नागपुरात आढळले आणि त्यातील 7 जणांचा मृत्यू झाला. या आजाराचे सर्वाधिक 21 बळी मुंबईत गेले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या 100 च्या आसपास असून राज्याच्या अन्य जिल्ह्यांतून हे रुग्ण गंभीर अवस्थेत मुंबईत दाखल होतात, असे अधिकार्यांनी सांगितले. एकीकडे रुग्ण वाढत असताना म्युकरमायकोसिसवरील प्रभावी औषधांची प्रचंड टंचाई महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. केंद्राने आधी अॅम्फोटेरेसीन-बी या औषधाचे 16500 आणि नंतर 5090 डोस पाठवले.
31 मेपर्यंतचा हा कोटा होता. राज्यभरात 2245 रुग्णसंख्या पाहता एका रुग्णास सरासरी 100 डोस लागतात. त्यानुसार राज्याला तातडीने 2.24 लाख डोसची गरज आहे. येत्या काही दिवसांत राज्यभरात सगळीकडेच या औषधाची टंचाई निर्माण होईल. त्यामुळे महाराष्ट्राचा कोटा वाढवावा अशी मागणी केंद्राकडे केली असल्याचे सांगून आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, 1 जूनपर्यंत राज्य सरकार अॅम्फोटेरेसीन-बीचे 60 हजार डोस खरेदी करणार आहे. पुढच्या महिन्यापर्यंत औषध पुरवठा सुरळित होण्याची आशा आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले की, प्रत्येक रुग्णालयात म्युकरमायकोसिसवर उपचार होऊ शकत नाहीत. कारण उपचार करताना शस्रक्रिया करून ही काळी बुरशी काढावी लागते. त्यासाठी प्लास्टिक सर्जन, नेत्ररोग तज्ज्ञ, कान, नाक, घसा तज्ज्ञ, मेंदूविकार तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि शल्यविशारद अशा डॉक्टरांचे पथक आवश्यक असते. त्यानुसार 131 रुग्णालयांनी म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्याची तयारी दर्शवली.
महाराष्ट्र 4 हजार 50, आंध्र प्रदेश 768, मध्य प्रदेश 752, तेलंगणा 744, उत्तर प्रदेश 701, राजस्थान 492, कर्नाटक 481, हरियाणा 436, तामिळनाडू 236, बिहार 215, पंजाब 141, उत्तराखंड 124, दिल्ली 119, छत्तीसगड 103, चंदीगड 83.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील 131 दवाखान्यांमध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर सरकारी खर्चात उपचार केले जात आहेत. या योजनेची मर्यादा तशी दीड लाख रुपये आहे मात्र म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा खर्च या मर्यादेपलिकडे गेला तरी तो सर्व खर्च सरकार उचलणार आहे.