महाराष्ट्र २४- सध्याच्या आक्षेपार्ह जाहिरात कायद्यानुसार पहिल्यांदा गुन्हा करणाऱ्यांवर सहा महिने तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा आहे. जर पुन्हा गुन्हा केला तर एका वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड आशी तरतूद आहे. नव्या मसुद्यात दंडाची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी दोन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि १० लाखापर्यंत दंड आणि पुन्हा गुन्हा केल्यास पाच वर्षापर्यंत तुरुंगवास आणि ५० लाख दंड अशी तरतूद करण्याच्या प्रस्ताव आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय औषध आणि सौंदर्य प्रसाधने वापरल्यानंतर गोरेपणा, लैंगिक उत्तेजना वाढते असा दावा करणारी जाहिरात करणाऱ्या कंपन्यांविरोधात कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. मंत्रालयाने आक्षेपार्ह जाहिराती कायदा १९५४ मध्ये दुरुस्ती करण्याबाबत मसुदा सादर केला आहे. कायद्यात सुधारणा झाल्यानंतर गोरेपणा, लैंगिक उत्तेजना वाढवणे अशा प्रकारचा दावा करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्यांवर ५० लाखापर्यंतचा दंड आणि ५ वर्षापर्यंत तुरुंगवास अशी शिक्षा करण्याची तरतूद केली आहे.
आक्षेपार्ह जाहिरात कायदा १९५४ सुधारणेच्या मसुद्यात नव्या ७८ आजारांचा सामावेश करण्यात येणार आहे. या आजारांबाबत झटपट दिलासा आणि संपूर्ण बरे करण्याचा दावा करणाऱ्या औषध, सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिराती करणे कायद्याने गुन्हा ठरवण्यात येणार आहे. या आजारांच्या यादीत लैंगिक उत्तेजन वाढवणे, लैंगिक दुर्बलता, स्वप्नदोष, गोरी त्वचा, एड्स, बुद्धिमत्ता वाढवणे, मुलांची-युवकांची उंची वाढवणे, लिंगाचा आकार वाढवणे, लैंगिक संबधांचा कालावधी वाढवणे, अकाली पांढरे केस अशासारख्या ७८ प्रकारच्या आजारांचा समावेश आहे. जे बरे करण्याचा दावा करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई होणार आहे.