परीक्षेविनाच दहावीचा जूनअखेर निकाल ; 11 वी प्रवेशाकरिता ऑनलाइन सीईटी; श्रेणी सुधार योजनेंतर्गतही मिळणार दोन संधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २९ मे । राज्यातील दहावीच्या २०२०-२१ वा शैक्षणिक वर्षातील परीक्षा रद्दच करण्याचा व अंतर्गत मूल्यमापनानुसार जूनअखेर १० वीचा निकाल जाहीर करण्याचा निर्णय राज्य शालेय शिक्षण मंडळाने घेतला. त्यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकष शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी जाहीर केले. जे विद्यार्थी या निकालाबाबत समाधानी नसतील, त्यांच्यासाठी काेविड स्थिती सुधारल्यावर श्रेणी सुधार योजनेअंतर्गत (क्लास इम्प्रूव्हमेंट) दोन संधी देण्यात येतील. अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमांवर अाधारित १०० गुणांची सीईटी हाेईल. हा निर्णय घेण्यासाठी विभागाने तज्ज्ञांच्या २४ बैठका घेतल्या. त्यात निकष निश्चित झाले. अाता शाळांनी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार अाहे.

राज्यातील १४ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबतचे हे महत्त्वाचे मुद्दे

100 गुण असे निर्धारित केले जातील
30 गुण वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनावर अाधारित
20 गुण गृहपाठ, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेवर अाधारित
50 गुण हे नववीच्या अंतिम विषयनिहाय गुणांच्या प्रमाणानुसार
सीईटीला प्रवेशासाठी प्राधान्य
अकरावी प्रवेशासाठी राज्यात आता एकच, १०० गुणांची, २ तासांची सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) हाेईल. ती दहावीच्या अभ्यासावर आधारित, वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी तसेच ऐच्छिक असेल. मात्र, प्रवेशासाठी त्याच गुणांना सर्वाेच्च प्राधान्य मिळेल. अकरावी प्रवेशाची मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.

अंतर्गत मूल्यमापनाची हीच पद्धत १७ नंबर फाॅर्म भरणारे बहि:स्थ (एक्सर्टनल) आणि नापास झाल्यानंतर फेरपरीक्षा देणाऱ्या (रिपीटर) विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात येणार आहे. मात्र हे विद्यार्थी वर्गाबाहेरचे असतात. मग, त्यांचे मूल्यमापन कसे काय केले जाऊ शकते, असा प्रश्न शैक्षणिक वर्तुळातून विचारला जातो आहे. त्यावर काेणतीही घाेषण मंत्रालयाने केलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *