रामदेव बाबांनी उडवली आयएमएच्या मानहानीच्या दाव्याची खिल्ली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ मे । योगगुरू रामदेव बाबा यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्यांची खिल्ली उडवली आहे. ज्यांना काही मान नाही, असे लोक एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करत असल्याचे म्हणत रामदेव बाबा यांनी आयएमएवर निशाणा साधला आहे.

रामदेव बाबा पुढे म्हणाले, देशात सध्या धार्मिक, वैचारिक आणि सांस्कृतिक दहशतवाद वेगाने पसरत आहे. यातच एका आणखी नव्या प्रकारच्या ट्रिटमेंट दहशतवादाचीही भर पडली आहे. त्याविरोधात आपली लढाई आहे. अॅलोपॅथिकचा हा उद्योग जवळपास दोन लाख कोटींचा आहे. याविरोधात आपण लढत आहोत. सरकार आपल्या बाजूने असो वा नसो, भलेही सरकार विरोध करो, पण आपला लढा सुरूच राहील आणि त्यात आपण यशस्वी होऊ.

रामदेवबाबा म्हणाले, कुठल्याही पॅथीसोबत आमची स्पर्धा नाही अथवा विरोध नाही. अॅलोपॅथी उपचार आकस्मिक स्थितीत आवश्यक असल्याचेही आपण मानतो आणि मान्यताही देतो. पण याचा अर्थ असा नाही, की केवळ हीच उपचार पद्धती आहे. अॅलोपॅथिक उपचार पद्धतीवर निशाणा साधत ते म्हणाले, आम्ही मानतो, की आपल्याकडे लाइफ सेव्हिंग ड्रग्स आणि अॅडव्हान्स सर्जरी आहे. पण आपल्याकडे या दोन गोष्टी असतील, तर आमच्याकडे 98 गोष्टी आहेत. आयुर्वेद आणि निसर्गोपचार सर्जरी न करता आणि औषध न घेताच उत्तम आरोग्य देते आणि 1000 हून अधिक व्याधींवर इलाज करते, असा दावाही रामदेव बाबा यांनी केला.

रामदेव बाबा यांनी याचवेळी असा आरोप केला, की देश आणि जगातील विविध रुग्णालयांत यावेळी कोरोनावरील उपचारासाठी जी-जी औषधी वापरली जात आहे, त्यांपैकी कुठल्याही एका औषधाचे अद्यापही कोरोनावरील उपचार प्रोटोकॉलअंतर्गत क्लिनिकल ट्रायल झालेले नाही. मग, कोणत्या आधारावर या औषधांचा वापर रुग्णांसाठी केला जात असल्याचा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *