मावळातील जनतेच्या पुण्याईनेच मी विधानसभेत गेलो;तळेगावला ‘विकासाचे रोल मॉडेल’ बनवण्यासाठी कटिबद्ध- आ. सुनील शेळकेंची ग्वाही

Spread the love

Loading

 महाराष्ट्र २४- तळेगाव दाभाडे-  मावळातील जनतेच्या पुण्याईनेच मी विधानसभेत गेलो. ८ वर्षे नगरसेवक म्हणून केलेल्या कामाची पावतीच इथल्या जनतेने दिली. त्यामुळे आता माझी जनतेप्रति जबाबदारीही वाढली आहे.  विकासासाठी जनतेच्या प्रतिनिधींप्रमाणेच प्रशासकीय अधिकारीही महत्त्वाचे ठरतात. तळेगाव शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून आपल्या सर्वांच्या सहकार्याने तळेगावला ‘ विकासाचे रोल मॉडेल’ बनवण्यासाठी प्रयत्न करणार, अशी ग्वाही मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी दिली. 
शनिवारी तळेगाव नगरपरिषदेच्या वतीने आ. शेळके यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी दिपक झिंजाड, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, मा.नगराध्यक्षा सुलोचनाताई आवारे, नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, ज्येष्ठ नेते गणेश खांडगे, किशोर आवारे यांच्यासह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते. 
यावेळी आ. शेळके यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. सभागृहात ताठ मानेने आलो याचा आनंद होतो आहे असे नमूद करताना त्यांनी आपल्या कामांची आणि अनुभवांची उजळणी केली. ते म्हणाले,  ८ वर्षे नगरसेवक म्हणून काम करीत असताना केवळ जनतेच्या हिताचाच विचार केला. प्रामाणिकपणे काम केले. जनतेचा पैसा योग्य ठिकाणी लागला पाहिजे, हीच भावना मनात ठेवून काम केले.  त्यामुळेच जनतेने मोठ्या विश्वासाने आपल्याला निवडून दिले. खरेतर जनतेनी दिलेला हा सत्तेचा मुकुट काटेरी आहे. सत्तेच्या या खुर्चीला खिळे आहेत. ते कर्तव्याची जाणीव करून देतात.
तळेगाव नगरपरिषदेकडून मागील 3 महिन्यांपासून एकही प्रस्ताव राज्यशासनाकडे दाखल झाला नसल्याची खंतही आ. सुनील शेळके यांनी व्यक्त केली. तळेगाव शहरात अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. रस्ते, भुयारी गटारे, पाणीपुरवठा, क्रीडांगणे, नाट्यगृहे अशी अनेक कामे अपूर्ण आहेत. या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी राज्यशासनाची मदत लागणार आहे. या तीन महिन्यांच्या काळात तळेगाव नगरपरिषदेने गांभीर्याने या कामांचा पाठपुरावा केला असता तर मी स्वतः या कामांच्या पूर्ततेसाठी लक्ष दिले असते, असे आ. शेळके म्हणाले. 
यावेळी नवनिर्वाचित उपनागराध्यक्षांना शुभेच्छा देताना आ. शेळके म्हणाले की, नगरपालिकेला भ्रष्टाचारमुक्त करायचे आहे. जनतेच्या पै – पै चा हिशोब द्यायचा आहे हे लक्षात घेऊनच कामे करायची आहेत. तुम्हाला जितके प्रस्ताव देता येतील, तितके द्या. त्याचा पाठपुरावा करून ती कामे पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल असे आश्वासन आ. शेळके यांनी दिले.  तळेगाव नगरपरिषदेत विरोधी पक्षनेते आणि उपनगराध्यक्ष आपलेच असल्यामुळे विकासाला प्राधान्य द्या,  असा सल्ला ही त्यांनी दिला. राजकारण करताना जे विकासाला बाजूला ठेवतील त्यांना जनताही बाजूला ठेवेल. तळेगाव शहर सुधारणा आणि जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे व्हावीत, अशी अपेक्षाही आ. सुनील शेळके यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *