महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जून । भारतीय हवामान खात्यानं (IMD) शेतकऱ्यांना दिलासा देणारी माहिती जारी केली आहे. यंदा राज्यात समाधानकारक पाऊस बरसणार असून राज्यात दुष्काळाची शक्यता जवळपास नसल्याचं भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता दूर झाल्या आहेत.
मान्सूनचा दुसरा सुधारित अंदाज हवामान खात्याने मंगळवारी जारी केला आहे. यानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात सरासरी 101 टक्के पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने यावर्षी पहिल्यांदाच 36 हवामान विभागातल्या पावसाचा अंदाज सांगितला आहे. या नवीन सुधारित अंदाजानुसार, यंदा कोकणात सरासरी पावसापेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार, कोकण आणि पूर्व विदर्भात सरासरी पावसापेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडातील काही भागांत जूनमध्ये कमी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. असं असलं तरी राज्यात दुष्काळ पडण्याची शक्यता केवळ 8 टक्के एवढी आहे.