बारावी परीक्षेचा राज्याचा निर्णय लवकरच ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । दहावी पाठोपाठ राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षाही रद्द होणार आहे. बुधवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बारावीची परीक्षा रद्द करण्याबाबत चर्चा झाली. परीक्षा रद्द करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभाग आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे प्रस्ताव सादर करणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बारावीची परीक्षा घेणे शक्य नसल्याची माहिती केंद्र सरकारला दिल्याचे वर्षा गायकवाड यांनी मंfित्रमंडळ बैठकीनंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. तसेच परीक्षेबाबत विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊनच लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

कोरोनामुळे 23 एप्रिलला होणारी बारावीची परीक्षा मेअखेरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर कोरोनाची आलेली दुसरी लाट, त्यात बालकांना जास्त प्रादुर्भावाची भीती यामुळे परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली. केंद्र सरकारने मंगळवारी सीबीएसईची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकांमध्ये सुसूत्रता असायला हवी अशी भूमिका घेतली आहे. ही सर्व माहिती आजच्या बैठकीत सर्वांसमोर मांडल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेलाच राज्य सरकारचे प्राधान्य असून आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर परीक्षेसंदर्भात निर्णय जाहीर करण्यात येईल, असेदेखील वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *