महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना बुधवारी 2 जून रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सुरु झाला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडकडून पदार्पण करणाऱ्या सलामीवीर डेव्हन कॉनवेने आपल्या कारकिर्दीची सुरुवात शानदार शतकाने केली. कॉनवेने भारताचा माजी कर्णधार गांगुलीच्या 25 वर्षांच्या करिश्म्याची पुनरावृत्ती केली.
माजी भारतीय कर्णधार आणि डावखुरा फलंदाज सौरव गांगुलीने 1996 मध्ये पदार्पण करताना लॉर्ड्स येथे झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध 131 धावा ठोकल्या होत्या.लॉर्ड्सवर कॉनवेपूर्वी, इतर दोन खेळाडूंनी कसोटी पदार्पणात शतकं ठोकली आहेत, पण लॉर्ड्समध्ये असा पराक्रम करणारा गांगुलीनंतर कॉनवे पहिला परदेशी खेळाडू आहे.
कॉनवे कसोटी सामन्यात शतक झळकावणारा न्यूझीलंडचा 12 वा खेळाडू असून तो पहिल्या दिवशी 136 धावांवर नाबाद खेळतो आहे. कॉनवेने लॉर्ड्स येथे कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा गांगुलीचा विक्रम मोडला.गांगुली आणि कॉनवे यांच्यात आणखी दोन समानता आहेत, हा केवळ योगायोग आहे. लॉर्ड्समधील पदार्पणाच्या शतकाव्यतिरिक्त, दोन्ही खेळाडू डाव्या हाताने फलंदाजी करतात. याशिवाय दोघांचा वाढदिवस 8 जुलैला असतो.