महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.५ जून । वारकरी संप्रदायाकडून पायी वारीचा आग्रह होत असताना वाखरी ग्रामस्थांनी मात्र पायी वारीला विरोध दर्शविला आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेत वाखरी गावातील 800 ग्रामस्थांना कोरोनाची बाधा झाली होती, तर 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आषाढी वारी प्रातिनिधिक साजरी करण्याची विनंती वाखरी ग्रामस्थांनी पालखी सोहळाप्रमुखांना केली आहे.
येत्या 24 जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा आहे. कोरोनाच्या सावटामुळे गेल्या आषाढी वारीसह चैत्री, माघी आणि कार्तिकी या चारही वाऱया प्रातिनिधिक स्वरूपात साजरी करण्यात आल्या आहेत. यावेळी मात्र पालखी आणि दिंडीप्रमुखांनी पायी वारीला परवानगी देण्याची मागणी केली आहे. मागणीत वारकऱयांच्या संख्येवर मर्यादा घाला; पण परवानगी द्या, असा आग्रह त्यांनी धरला आहे.
गेल्या वर्षी मानाच्या पालख्या व पादुका एसटीने पंढरपूरला नेण्याची व्यवस्था केली होती. तत्पूर्वी आळंदी आणि देहू येथील प्रस्थान सोहळ्यांना शासनाने भाविकांची मर्यादा घालून परवानगी दिली होती. मात्र, दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक पटीने भाविकांची गर्दी झाली होती. हा अनुभव पाहता पायी वारीच्या गर्दीवर नियंत्रण करणे जिकिरीचे होणार आहे. त्यात सगळे पालखी सोहळे वाखरी गावात मुक्कामी असतात. गेल्या दोन महिन्यांमध्ये वाखरी गावातील आठशेहून अधिक ग्रामस्थ कोरोनाबाधित झाले होते, तर तीसहून अधिक ग्रामस्थ दगावले आहेत. कोरोना महामारीचा कहर काहीसा कमी झाला असला तरी आजही वाखरी गावात तीसपेक्षा जास्त कोरोनाबाधित आहेत. त्यात तिसऱया लाटेचे तज्ञांनी संकेत दिले आहेत. वाखरी ग्रामस्थ आणि वारीच्या निमित्ताने येणाऱया भाविकांच्या जीविताची दक्षता पाहता यंदाची आषाढी वारी ही प्रातिनिधिक स्वरूपात साजरी करावी, अशी विनंती वाखरी ग्रामस्थांनी देहू, आळंदी संस्थान व पालखीप्रमुखांना पत्र पाठवून केली आहे.