Tesla ने भारतात वरिष्ठ पदांसाठी सुरु केली नोकर भरती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जून । भारतातील आपल्या प्रकल्पासाठी इलेक्ट्रिक कार बनविणारी जगातील सर्वात मोठी कंपनी टेस्लाने (Tesla) कर्मचारी भरती करण्यास सुरुवात केली आहे. कंपनी सध्या केवळ लीडरशिप पोझिशन आणि वरिष्ठ पातळीवर पदांसाठी भरती करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उदयोन्मुख कार बाजारावर अमेरिकन कंपनी लक्ष ठेवून आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, इलेक्ट्रिक-कार निर्माता कंपनी विक्री प्रमुख, विपणन प्रमुख आणि एचआर हेडच्या शोधात आहे. टेस्लाचे सेलिब्रिटी मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी यावर्षी टेस्ला भारतात प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

13 जानेवारी रोजी एका ब्लॉग रिपोर्टला उत्तर देताना जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांनी सांगितले होते की, टेस्ला भारतात कार्यालये, शोरूम, संशोधन व विकास केंद्रे आणि शक्यतो कारखाना उघडण्यासाठी अनेक राज्यांशी चर्चा करीत आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारी महिन्यात सांगितले की, टेस्लाने आपल्या भारतामधील पहिल्या प्लांटसाठी कर्नाटकची निवड केली आहे.

त्याचबरोबर टेस्लाने भारतांमधील प्रमोशन बॉडी इन्व्हेस्ट इंडियाचे माजी कार्यकारी मनुज खुराना यांना आपले लॉबिंग आणि बिझनेसचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त केले होते. कंपनीने निशांतला चार्जिंग मॅनेजर म्हणून नेमले आहे, जो टेस्ला इंडियासाठी सुपरचार्जिंग, डेस्टिनेशन चार्जिंग आणि होम चार्जिंग व्यवसायाचे नेतृत्व करेल. गेल्या आठवड्यात टेस्ला फॅन क्लबने ट्विट केले होते की कंपनीने आपल्यासोबत वरिष्ठ कायदेशीर सल्लागार आणला आहे. टेस्ला येथे गेल्या चार वर्षांपासून सेवा करणारे प्रशांत मेनन यांची कंट्री सीईओ म्हणून पदोन्नती झाल्याची बातमी गेल्या महिन्यात आली होती.

सध्या कंपनी इलेक्ट्रिक गाड्यांवरील जीएसटी बदलांबाबत भारत सरकारच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहे. जीएसटी कमी झाल्यामुळे इलेक्ट्रिक कार खरेदी करणे सोपे होईल. मीडिया रिपोर्टनुसार, टेस्ला कंपनी राजधानी नवी दिल्ली, पश्चिमेकडील आर्थिक केंद्र मुंबई आणि दक्षिणेतील तांत्रिक शहर बेंगलुरूमध्ये शोरूम आणि सेवा केंद्रे उघडण्यासाठी 20,000-30,000 चौरस फूट कमर्शिअल प्रॉपर्टीजच्या शोधात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *