महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जून । पावसाळ्यात तांत्रिक बिघाडाबरोबरच वीज वाहिन्यांवर झाड कोसळणे, विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित होतो, तेव्हा सदर बिघाड दुरुस्त होण्याची वाट न पाहता संबंधित ग्राहकांना तत्काळ पर्यायी मार्गाने वीज पुरवठय़ाची व्यवस्था करावी, असे निर्देश महावितरणने आपल्या विभागीय कार्यालयांना दिले आहेत.
महावितरणने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केली आहेत. त्याचा आढावा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी घेतला. पावसाळ्यात विविध कारणांनी वीजपुरवठा खंडित झाल्यास प्राधान्याने पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरू करावा, सोबतच यंत्रणा दुरुस्तीचे कामदेखील युद्धपातळीवर करावे, असे निर्देश सिंघल यांनी दिले आहेत. तसेच खंडित वीज पुरवठय़ाची आणि पूर्ववत होण्यासाठी लागणाऱया वेळेची माहिती संबंधित वीजग्राहकांना देण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, ऑक्सिजन प्लांटचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत विशेष खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.