अर्थमंत्री सीतारामन यांचे निर्देश; या दोन विमा योजनांमधील दाव्यांचा होणार तातडीने निपटारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ जून । करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात कहर केला आहे. त्यातून खडबडून जागे झालेल्या केंद्र सरकारने आता सर्व स्तरातून प्रयत्न वाढवले आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना (पीएमजेजेबीवाय) आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (पीएमएसबीवाय) या दोन योजनांमधील विमा दावे सात दिवसांच्या आत निकाली काढावेत , असे निर्देश अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत.

नुकताच विमा कंपन्यांच्या प्रमुखांशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी विमा दाव्यांचा निपटारा जलदगतीने करण्याच्या सूचना कंपन्यांना दिल्या. विशेषतः केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना (पीएमजेजेबीवाय) आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (पीएमएसबीवाय) या दोन योजनांमधील दावे सात दिवसांच्या आत निकाली काढावेत, असे सीतारामन यांनी म्हटलं आहे. सध्या या योजनांमध्ये विमा दाव्याचा निपटारा करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी लागतो.

विमा दाव्याची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत असावी. दाव्यांचा निपटारा होण्यासाठी कंपन्यांनी संपूर्ण डिजिटल प्रणालीचा अवलंब करावा असे निर्देश त्यांनी दिले. बँक आणि विमा कंपनी यांच्यामधील प्रक्रिया पूर्णपणे डिजीटल असावी, जेणेकरून पेपर देवाणघेवाण करताना होणारा विलंब टाळता येईल, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेत आतापर्यंत ४६५००० विमा दाव्यांची पूर्ती केली आहे. त्यापोटी वारसांना ९३०७ कोटी विमा लाभ देण्यात आल्याचे सीतारामन यांनी सांगितले. तर करोना काळात १२०००० विमा दावे निकाली काढण्यात आले असून २४०३ कोटी रुपये देण्यात आले. प्रधानमंत्री बिमा सुरक्षा योजनेत ८२६६० विमा दावे निकाली काढण्यात आले असून त्यापोटी १६२९ कोटीचे वाटप करण्यात आल्याची माहिती सीतारामन यांनी दिली.

कोव्हीड-१९ चे विमा दावे प्राधान्याने पूर्ण करावेत असेही सीतारामन यांनी यावेळी विमा कंपन्यांच्या प्रमुखांना बजावले. यावर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्याच्या सूचना विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाला (आयआरडीए) देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *