आमदार निलेश लंकेंच्या कोविड सेंटरमध्ये पार पडला आदर्श लग्न सोहळा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जून । अहमदनगर (Ahamadnagar) जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. नुकतेच नगर जिल्ह्यात या संदर्भातले सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत आणि त्यानंतर पारनेर तालुक्यातील दोन जोडप्यांनी चक्क कोविड सेंटरमध्येच लग्न केलं आहे. लग्नात होणारा अवांतर खर्च टाळून या जोडप्यांनी कोविड सेंटरला (Covid center) मदत केली आहे.

हौशी जोडप्यांनी विविध ठिकाणी विविध प्रकारे लग्न केल्याचे आपण पाहिले आहे. असाच एक विवाह सोहळा अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये पार पडला. पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार निलेश लंके (NCP MLA Nilesh Lanke) यांच्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर या कोविड सेंटरमध्येच दोन जोडप्यांनी लग्न केले आहे. अनिकेत सखाराम व्यवहारे व आरती नानाभाऊ शिंदे, तसंच राजश्री काळे व जनार्दन पुंजाजी कदम यांनी आपल्या नवीन वैवाहिक जीवनाची सुरुवात कोविड सेंटर मध्ये लग्न करून सुरुवात केली आहे.

विवाह म्हटला तर खर्च हा येतोच. या अवांतर खर्चाला आळा घालून ती रक्कम कोरोना रुग्णांच्या कामी यावी, या सामाजिक जाणिवेतून या दोन्ही नव वधू-वरांनी संपूर्ण रुग्णांसाठी मास्क, सॅनिटायझर, PPE कीट, अत्यावश्यक औषधे या सेंटरला दिले आहे. इतकेच नाही तर 37000 रुपयांची आर्थिक मदत देखील केली आहे. कोरोना रुग्णांना आपले नातेवाईक, हितचिंतक, वऱ्हाडी आहे असे समजून भोजनही दिले.

अहमदनगर जिल्ह्यातल्या या अनोख्या विवाह बंधनात अडकणाऱ्या नवदाम्पत्यांनी ऐतिहासिक निर्णय घेत शासनाच्या सर्व अटी व नियमांचे पालन करत कोरोना तपासणी करून घेत एक अनोखे शुभ मंगल कार्य कोविड सेंटरमध्ये पार पाडले. कोरोना रुग्णांचा आशीर्वाद घेत नवीन वैवाहिक जीवनास या नव दाम्पत्याने सुरुवात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *