महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.८ जून । करोना संकटाची तीव्रता कमी होऊ लागल्याने गुंतवणूकदार भांडवली बाजाराकडे वळाले आहेत. एरव्ही अनिश्चित वातावरणात भरवशाचे आणि सुरक्षित वाटणाऱ्या सोन्याची चमक फिकी होऊ लागली आहे. आज मंगळवारी सकाळच्या सत्रात सोने ७० रुपयांनी तर चांदीमध्ये २०० रुपयांची घसरण झाली.गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते.
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ४९०७१ रुपयापर्यंत खाली आला. त्यात ७० रुपयांची घसरण झाली. एक किलो चांदीचा भाव ७१५७४ रुपये झाला आहे. त्यात २४३ रुपयांची घसरण झाली आहे. काल सोमवारी पहिल्या दोन्ही सत्रात सोने आणि चांदीवर दबाव होता. मात्र शेवटच्या सत्रात खरेदी दिसून आली. बाजार बंद होताना सोने १७५ रुपयांनी वधारले आणि ४९१६९ रुपयांवर स्थिरावले. चांदीचा भाव २६८ रुपयांनी वाढला आणि तो ७१८०७ रुपयांवर बंद झाला होता. यापूर्वी गेल्या आठवड्यात मंगळवारी चांदीने ७३१०० रुपयांचा स्तर गाठला होता.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज मंगळवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७५०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेटचा भाव ४८५०० रुपये झाला आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७९४० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५२२९० रुपये झाला आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४६३०० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०५०० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८०२० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०७२० रुपये आहे.