महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जून । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील काही नेते उद्या मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान लसीकरण, तौकते चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यासह राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट मिळावी म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती मान्य केली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्याचे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.