महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जून । स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले आहे. यासह खासदार राणा यांना कोर्टाकडून 2 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता नवनीत राणांची खासदारकीही धोक्यात आली असल्याचे बोलले जात आहे. या सर्व प्रकरणनंतर आता नवीन राणांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी शिवसेनेवर गंभीर आरोपही केले आहेत.
नवनीत राणा यावेळी बोलताना म्हणाल्या की, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश मी अद्याप वाचलेला नाही. मात्र यामध्ये पॉलिटिकल खिचडी शिजली असल्याचे त्या म्हणाल्या. कारण, अचानक कोर्टाचा असा निर्णय येणे म्हणजे कुठेतरी राजकीय खिचडी शिजली हे नक्की असेही नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
पुढे बोलताना राणा म्हणाल्या की, ‘गेली 9 वर्षे मी हा लढा देतेय. या प्रकरणात कोणी राजकारण केले हे मला सांगण्याची गरज नाही. मात्र माझा आणि शिवसेनाचा हा वाद सर्वश्रुत असल्याचेही नवनीत राणा म्हणाल्या. दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयानंतर न्याय मागण्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयात जाईन. मला न्यायावर विश्वास असल्याचेही नवनीत राणा म्हणाल्या.
कोर्टाच्या निर्णयाचा आदर करते
कोर्टाच्या निर्णयाविषयी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, मी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करते. अद्याप मी न्यायालयाचा आदेश वाचलेला नाही. गेल्या आठ वर्षांपासून आम्ही यावरुन भांडत आहोत. महिलेला अनेक परिश्रम करावे लागतात आणि परिश्रम मी गेल्या 9 वर्षांपासून केले आहेत. न्यायालयाने मला 6 आठवड्यांचा वेळ दिलेला आहे. कोणत्या कारणामुळे प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेय याचा मी अभ्यास करेल. मला न्यायावर आणि माझ्या कामावर विश्वास असल्याचेही नवनीत राणा म्हणाल्या.