महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जून । ऍलोपॅथी आणि आयुर्वेदच्या वादामुळे बाबा रामदेव (Baba Ramdev) गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आले आहेत. बाबा रामदेव म्हणाले होते, की त्यांना कोरोना लसीची (Corona Vaccine) गरज नाही. कारण, त्यांच्याकडे योगा आणि आयुर्वेदाचं संरक्षण आहे. मात्र, गुरुवारी त्यांनी आपल्या पहिल्या वक्तव्यावरुन पलटी घेत आपण कोरोना लस घेण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर आता त्यांनी डॉक्टर देवदूत असल्याचंही म्हटलं आहे.
बाबा रामदेव यांनी कोरोना संक्रमणाबाबत बोलत ऍलोपॅथी औषधांच्या साईट इफेक्टबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, यानंतर वादाला सुरुवात झाली होती. मेडिकल क्षेत्रातील लोक बाबा रामदेव यांच्यावर नाराज होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जूनपासून सर्वांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली आणि यानंतर बाबा रामदेव यांनी या निर्णयाचं स्वागत करत, सर्वांनी कोरोना लस घ्यायला हवी, असं म्हटलं.उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, की कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन योग आणि आयुर्वेदाच्या डबल प्रोटेक्शनचा लाभ घ्या. यामुळे कोरोनाविरोधातील लढ्यात एकाही व्यक्तीचा मृत्यू होणार नाही.
त्यांना असा सवाल केला गेला , की तुम्ही लस कधी घेणार, यावर उत्तर देताना ते म्हणाले, की लवकरच. बाबा रामदेव यांनी ऍलोपॅथी डॉक्टरांचं कौतुक करण्यासोबतच ते देवदूत असल्याचंही म्हटलं. इंडियन मेडिकल असोसिएशनसोबत (IMA) सुरू असलेल्या वादाबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. याबाबत बोलताना ते म्हणाले,की कोणत्याही संघटनेसोबत माझी दुश्मनी असू शकत नाही. मी केवळ औषधांच्या नावानं सुरू असलेल्या लोकांच्या शोषणाविरोधात होतो, असं त्यांनी म्हटलं. ते म्हणाले, की पंतप्रधान जन औषधी केंद्र उघडण्याची गरज पडली कारण डॉक्टर अनेकदा साध्या औषधांच्या जागी महागडी औषधे देत असतात. मात्र, प्रत्यक्षात ती अत्यंत स्वस्त असतात.