![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जून । संभाव्य पूरस्थितीचा विचार करुन पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईचे काम तातडीने पूर्ण करा असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी संबंधित अधिका-यांना दिले. शहरातील नाले साफसफाईच्या कामाचा आढावा आज आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला.
आयुक्त पाटील म्हणाले, पाण्याचा प्रवाह विविध कारणांनी रोखला गेल्याने पाणी तुंबले जाते. यासाठी शहरातील मुख्य नाले, ओढे, बंदीस्त नाले, उपनाले, सी.डी. वर्कस, पाईप कलव्हर्टस, गटारे यांची साफसफाईची कामे पूर्ण करावीत. पावसाळ्यातील प्राधान्याने करावयाच्या कामासाठी क्षेत्रिय अधिका-यांनी पुढाकार घेऊन विभागांतर्गत समन्वय ठेवावा. सर्वेक्षण करुन कालबध्द कार्यक्रमाची आखणी करुन सर्व साफसफाई वेळेत होईल याची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी कायम पाणी साचते त्या भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरणार नाही यासाठी त्या भागाची पाहणी करुन तात्काळ उपाययोजना करावी. अडचणीच्या ठिकाणी तसेच इतर प्राधिकरणाशी संबंधित नाले सफाईचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे समन्वय साधून मोहिम राबवावी आदी सुचना आयुक्त पाटील यांनी दिल्या.