महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जून । एकिकडे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलनाची हाक दिलेली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळ्यांचं लक्ष वेधणारी ही भेट ठरली. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन पुकारलं आहे. त्यामुळे शाहू महाराज आणि अजित पवार यांच्यामध्ये काय चर्चा होते, याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागलं होतं. अशातच या भेटीनंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी माध्यमांशी बातचित करत या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेसंदर्भात माहिती दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणत्या सुविधा देता येतील याबाबत भेटीदरम्यान चर्चा झाल्याची माहिती श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी दिली.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज बोलताना म्हणाले की, “एकंदरीत सर्वच मुद्द्यांवर चर्चा झाली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतःच माहिती देतील.” अजित पवारांशी चर्चा करताना काय मार्गदर्शन केलं या प्रश्नावर बोलताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, “मार्गदर्शन हेच केलं की, मराठा समाजासाठी जेवढं काही करणं शक्य आहे. तेवढं त्यांनी करावं. हे अजित पवारांनी मान्य केलं आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणावर निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल पुन्हा एकदा अभ्यासला पाहिजे. समजून घेतला पाहिजे आणि जेवढं शक्य असेल ते सगळं केलं पाहिजे.” तसेच संभाजीराजेंनी 16 जूनपासून आंदोलनाची हाक दिली आहे. यासंदर्भात काही चर्चा झाली का? असं विचारल्यावर या आंदोलनाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असं श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं.