17 जून रोजी दूध दर आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जून – दूध दर व शेतकरी प्रश्नांसाठी 17 जून रोजी महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेचे अध्यक्ष डॉक्टर अजित नवले यांनी सांगितले किसान सभेच्या राज्य कौन्सिल बैठकीतील निर्णय घेण्यात आलेला आहे.

लॉकडाऊनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची खासगी व सहकारी दूध संघाकडून मोठी लूटमार करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत खाजगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर दहा ते पंधरा रुपये प्रति लिटरने पाडले असून ग्राहकांसाठीचे विक्रीदर मात्र तसेच ठेवत शेतकरी व ग्राहकांची प्रचंड लूटमार केली आहे. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचा बाऊ करत ज्या खाजगी व सहकारी दूध संघांनी, दूध खरेदीचे दर पाडले त्या सर्व दूध संघांचे ऑडिट करा, प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली होती व त्याप्रमाणात किती दर कमी देण्यात आले याबाबत सखोल चौकशी करा व परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या खाजगी व सहकारी दूध संघांवर कठोर कारवाई करा, केलेली लूटमार वसूल करून ती शेतकऱ्यांना परत करा, आगामी काळात अशा प्रकारची लूटमार करता येणार नाही यासाठी खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा कायदा करा, दूध व्यवसायाला साखर धंद्याप्रमाणे रेव्हेन्यू शेअरींग व किमान हमी दर असे दुहेरी संरक्षण लागू करा, खरीप हंगामाच्या तयारीसाठी राज्यभर सर्वत्र पुरेसे खत, दर्जेदार बियाणे, शून्य व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्या, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे यासाठी विमा योजनेची सक्षम व पारदर्शक अंमलबजावणी करा, लॉकडाऊनच्या काळात थकलेली वीजबिले विनाशर्त माफ करा, आदिवासी शेतकऱ्यांना खावटी अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला, मात्र अद्यापही राज्यभरातील लाखो आदिवासी शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेले नाही, ते अनुदान सर्व श्रमिक आदिवासींना तातडीने द्या, वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीला सर्वत्र चालना द्या, वृद्ध, अपंग, निराधार, विधवा, परित्यक्ता, यांना लॉकडाउन काळात अतिरिक्त 1 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती या घोषणेची अंमलबजावणी करा व या योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान किमान 3 हजार रुपयांपर्यंत वाढवा, कोविड महामारीचे संकट अद्यापही संपलेले नसल्याने, सर्वत्र पुरेशा आरोग्य व्यवस्था शासकीय यंत्रणेमार्फत उपलब्ध करा आणि सर्वांचे मोफत व त्वरित लसीकरण करा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

17 जून रोजी राज्यभरातील तहसील कार्यालयांवर कोविडची नियमावली पाळत करण्यात येत असणाऱ्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी केले आहे. ।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *